पत्र

असेच काही न सांगता येणारे विचार व भावना….आपल्या सगळ्यांच्या मनात आपल्या आई वडील विषयी अश्या भावना असतात त्या आपण कधीच बोलून दाखवत नाही. त्या सांगणे आवश्यक असते. आज ना उद्या… तसेच काहीसे हे.. direct तोंडावर सांगण्यापेक्षा त्या लिहून सांगताना जास्त स्पष्ट होतात.

प्रिय आई बाबा,

मनातल्या मनातच लिहिलेले हे पत्र, विचार. आजच तुम्ही दहा दिवस माझ्याकडे राहून परत घरी गेला आहात. कधी बोलत नाही, पण मला देखिल चुकल्याचुकल्या सारखे वाटणारच आहे. गेली अठरा वर्षे पुण्यात एकटा राहतोय. जेव्हा कधी महाडला घरी येतो आणि तिकडून परत येतो त्यावेळेला देखील एक वेगळी जाणीव असते.

आज पर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केले आहे हे शब्दात सांगणे फार कठीण आहे. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी घर सोडून पुण्यात आलो शिक्षणाकरता. त्यामध्ये गुरूंना भेटलो. आयुष्य बदलले. बाकी शिक्षण नोकरी उद्योगधंदा या गोष्टी सुरळीतपणे झाल्या परंतु लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. एकुलता एक मुलगा असल्याने एकंदरीतच कोणत्याही आई-वडिलांना हा निर्णय फारसा मानवणार नाही. परंतु मला कधीही एकाही शब्दाने विरोध न करता तुम्ही ज्या पद्धतीने वागला आहात त्याला कोणतीच उपमा नाही. बरेच लोक आईला विचारत असतात असा कसा हा तुमचा मुलगा तुमच्या ऐकत नाही? त्यावर आई त्यांना उत्तर देते की हे त्याचे आयुष्य आहे व त्याने ठरवायचे आहेत असेच चालायचे आम्ही फक्त सांगायचं काम करू शकतो. आज देखील घरा मधून निघताना बाबा इतकेच म्हणाले ही बघ अजून वय आहे वेळ गेलेली नाही तर लग्नाचा विचार करू शकतोस. आधी देखील हेच म्हणाले की जे काही करशील ते शेवटपर्यंत पाळ. ,🙂 जय काही निर्णय घेतलेले आहेस ते आम्हाला पटेल किंवा न पटेल परंतु आम्ही कायम मदतीसाठी असू. अशाप्रकारे इतके जास्त समजूतदार असलेले आई-वडील किती जणांना मिळतात हा प्रश्नच आहे.

आई-वडील आर्थिक दृष्ट्या मुलांवर अवलंबून असतील तर कधीकधी अशा गोष्टी लाचारी मुळे घडू शकतात हे मुलगा जे काही ठरवत आहे ते ऐकणे. परंतु तुम्ही कधीही आयुष्यात माझ्याकडून एक रुपया देखील घेतला नाही उलट मला देत आला आहात. त्यामुळे यामागे केवळ मॅच्युरिटी आणि समजूतदारपणा हे एकच कारण उरते.

बऱ्याच गोष्टी मी तश्या समाजाच्या विचारधारणा याच्या विरुद्ध करत असतो. कारण निवडलेला रस्ताच थोडा वेगळा आहे कदाचित त्यामुळे. कोणत्याही वडिलोपार्जित इस्टेट किंवा पैसा दागिने यांमध्ये माझे नाव ठेवायचे नाही हेदेखील मी तुम्हाला मोकळेपणाने स्पष्ट सांगितलेले आहे. हे ऐकून देखील कोणत्याही आई-वडिलांना थोडेफार वाईट वाटणारच याची देखील जाणीव आहे. परंतु तुम्हीच मला सांगा. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंतच माझा या घराण्याशी संबंध. नाही का? तुम्ही नसल्यावर ते घर किंवा तो पैसा त्याच्यात मला काय इंटरेस्ट? तुम्ही नसलेले घर काय कामाचे?? आता दिवाळी साठी जेव्हा हजार रुपये देता मला ते जास्त महत्त्वाचे वाटतात.

प्रत्येक माझी चुकीची गोष्ट देखील हसण्यावारी नेऊन, माझा बेजबाबदारपणा देखील पूर्णपणे हसण्यावारी नेऊन. परंतु तू मला वेळोवेळी काय केले पाहिजे हे देखील तुम्ही सांगितले. परंतु कोणत्याही गोष्टीचा हट्ट किंवा अधिकार गाजवला नाही. जबरदस्त पारमार्थिक बैठक असल्याची ही एक खूण.

मी आजपर्यंत बऱ्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेतले उदाहरणार्थ फोटोग्राफी काय किंवा परमार्थी साधना काय फिरणे व अनेक गोष्टी. परंतु कोणत्याही गोष्टीला तुम्ही कधीही मला अडवले नाही. बाकी घरांमध्ये मी पाहिले आहे की मुलांची शक्ती आई-वडिलांशी झगडताना खर्च होत असतो. परंतु तुम्ही यामध्ये ज्या प्रकारे साथ दिली आहे त्यामुळेच मी बाकीच्या सर्व गोष्टी करू शकलो.

यावेळी देखील दिवाळीत तुम्ही दहा एक दिवस माझ्या घरी होतात. माझा गॅस सिलेंडर संपलेला होता व तुम्ही मला आधीपासून तो आणायला सांगितला होता. परंतु त्यामध्ये मी इतका आळशीपणा केला, घरात इलेक्ट्रिक शेगडी आहे व मायक्रोवेव्ह ओव्हन आहे ही कारणे सांगून टाळाटाळ केली. आईला त्यावर स्वयंपाक बनवायची सवय नाही त्यामुळे बऱ्याच वेळेला मी बाहेरून विविध गोष्टी खायला-प्यायला आणल्या. परंतु आईचे सुख याच्यातच असते हे स्वतःच्या हाताने पदार्थ करून मुलाला खायला घालण्यात. इतकी छोटी गोष्ट देखील मी करू शकलो नाही. परंतु त्यावरही तुम्ही चिडचिड केली नाहीत. मात्र मी जेव्हा महाडला येतो त्या वेळेला प्रत्येक गोष्ट माझ्या मना सारखी कशी होईल याच्याकडे मात्र तुमचे इतके जास्त लक्ष असते. त्यामुळे मुलगा म्हणून खरंच मी काहीही नाही इतके मला समजतं. इतक्या छान आई-वडिलांचा मुलगा कसा नसावा याचे मूर्तीमंत उदाहरण मी आहे. परंतु मी यापुढे त्याची काळजी घेईन नक्की.

महाड ला मे जेव्हा दोन दिवसांसाठी येतो तेव्हा, मी आलो की काय करू आणि काय नाही असे तुमच् झालेले असते. आई माझ्या खाण्या पिण्या बाबत प्रचंड उत्साही. त्यामुळे कायम काय करू आणि काय नाही असे झालेले असते तिचे. आणि तुम्ही देखील प्रत्येक छोटी आणि छोटी गोष्ट माझ्यासाठी करत असता. इतक्या प्रेमाने आणि दाखवून न देता.

महाड वरून निघताना पूर्ण प्रवासामध्ये एक विचार प्रचंड त्रास देतो. काही वर्षांनी या घरात कोणीही नसेल. पाय टाकणं देखील शक्य नसेल मला तिकडे घरी. कितीही भावना कंट्रोल करायचा म्हटल्या तरी या एका बाबतीत ते शक्य नाही. मी कधी त्या दाखवत नाही. पण हा एक परिच्छेद लिहिताना किती वेळ लागला हे माझं मला माहिती.

महाड वरून ज्या दिवशी मी निघणार असतो पहाटे त्याच्या आदल्या दिवशी रात्री किंवा तुम्ही पुन्हा वरून ज्या दिवशी सकाळी निघणार असाल त्याच्या आदल्या दिवशी रात्री. मी झोपेत असताना बाबांचा हात डोक्यावरून फिरत असतो. सगळ्या भावना असतात. बाबांचा हात डोक्यावरून फिरतो आहे ती बेस्ट भावना. त्याच प्रमाणे त्यांना काय वाटत असेल हे देखील माहित असते. उद्यापासून आपला मुलगा परत एकटा असेल, त्याचे एकट्याचे जेवण व राहणे हे सर्व विचार तुमच्या मनात असतील. जास्तीत जास्त हे जाणून घ्यायचा मनातून मी प्रयत्न करत असतो त्यावेळेला देखील. मग मी लहानपणी जसा तुमच्या अंगावर एक पाय टाकून झोपायचो तसाच आज देखील तुमच्या जवळ सरकुन एक पाय अंगावर टाकला.

प्रेम या गोष्टीवर माझा विश्वास नाही. कारण अपेक्षाएँ शिवाय प्रेम करणे हे शक्य नसते. मी कोणावरही करतो की नाही हे देखील मला माहित नाही कारण प्रेम ही अत्युच्च गोष्ट आहे आणि मी अत्यंत साधारण माणूस. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने माझ्याबरोबर वागला आहात ते माझ्या दृष्टीने जगातील सर्वोच्च सुंदर भावनांचे मिश्रण आहे. असे इतके जास्त समजूतदार आई-वडील जर का प्रत्येकाला मिळाले तर जग खूप वेगळं असेल.

मी तुम्हाला इतकेच सांगू शकतो, तुम्ही आई वडील म्हणून तुमचं कर्तव्य मी आज पर्यंत वाचलेल्या किंवा ऐकलेल्या कोणाही आई-वडिलांना पेक्षा खूप जबरदस्त पार पाडलेले आहे. मी माझे पुर्ण आयुष्य तुमच्यासाठी दिले तरीदेखील तुम्ही मला दिलेल्या गोष्टी समोर ते काहीच नाहीये. माझ्या भावना आणि याबाबतचे विचार मी कधी दाखवत नाही आणि बोलतही नाही. कधीतरी तुम्हाला देखील असे वाटते की मी प्रचंड कोरडा आहे. अर्थात खरोखर मी बर्‍याच गोष्टी मध्ये भावनाशून्य आहे किंवा भावनांना माझ्या बुद्धीच्या वर स्वार होऊन देत नाही हे सत्य आहे.

मी एकटा आहे आणि एकटा राहतो तरीदेखील मला फारसा फरक पडत नाही.गुरूने अशी साथ दिलेली आहे की कोणीही तशी साथ देऊ शकणार नाही. परंतु त्यांच्याशिवाय निस्वार्थ प्रेम करणारे या जगामधील कोणीतरी आहे ते म्हणजे तुम्ही… जाणीव असते की महाडला माझे आई-बाबा आहेत. या एका जाणिवेमुळे आत्तापर्यंत घरी मी एकटा आहे हे कधी जाणवले नाही. बाकी कोणत्याही नवीन व्यक्तीची मला माझ्या आयुष्यात खरोखरच कधी वाटली नाही आणि वाटणार देखील नाही.

परंतु तुम्ही नसाल त्यावेळेला खूप गणित बदलेल. प्रचंड मोठी जागा रिकामी होईल. हक्काने जाण्याचे घर नसेल. हक्काने काहीही खायला मागण्यासाठी कोणी नसेल. न मागता सगळे देणारे कोणी नसेल.परंतु याच बरोबर तुम्ही ज्या पद्धतीने मला घडवले आहे त्यामध्ये एक निश्चित की मी कधीही हारणारा किंवा निराश होणारा नाही. या गोष्टी सर्वांच्याच आयुष्यात घडतात. आज नाही तर उद्या. गुरु कृपे मुळे आत मधून मी पूर्ण शांत आहे त्यामुळे कोणत्याच गोष्टीने मी गांगरून जाईन किंवा दुःखाच्या आवेगात असेल असे होणार नाही.

असो,

तुमच्या सारखे आई वडील असल्याने मला माझे आयुष्य परिपूर्ण वाटत आले आहे. लहानपणापासून तुम्ही माझ्यासाठी केलेली प्रत्येक गोष्ट मला आठवते. त्यात कधीच कोणतीच कमतरता नव्हती. मी घेतलेले निर्णय व तुम्ही माझ्यावर टाकलेला विश्वास, माझे काही निर्णय जे तुमच्या विरोधात असताना देखील तुम्ही टाकलेला विश्वास. काही तोडच नाही या सगळ्याला. आत्ताच्या आयुष्यात देखील जेवढे शक्य असेल तेवढे मी तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेन. अर्थात तुम्ही जे काही दिलेले आहेत त्याच्यासमोर ते काहीच नाहीये. परंतु जर का अजून पुढचे जन्म असतीलच तर आई-वडील असावेत तर तुम्हीच. हे मात्र नक्की वाटते. इतके चांगले आई-वडील मिळाले असताना त्यांचे न ऐकणारा मुलगा असेच बरेच लोक मला समजतात व समजतील. आणि त्याबद्दल मला तक्रार असण्याचे देखील काहीच कारण नाही. 🙂

अर्थात बऱ्याच मतांमध्ये किंवा वागण्यामध्ये मीच कमी पडतो कारण discipline किंवा शिस्त प्रकार माझ्यात अजिबात नाही हे पूर्ण मान्य. व काही बाबतीमध्ये माझे विचार जास्तच आधुनिक असावेत जे सोसायटीमधील फारशा लोकांना मानवणार नाही तसे त्यामुळेदेखील. काही गोष्टींमध्ये आपली मते मिळतेजुळते नाही परंतु त्याचा परिणाम या नात्यावर कधीच नसेल ना तुमच्याकडून माझ्याकडून याची मला खात्री आहे.

प्रेमावर माझा फारसा विश्वास नसला तरीदेखील जर माझ्या अत्युच्च भावनांना मी प्रेम हे नाव दिले तर इतकेच सांगू शकेन माझे नक्कीच तुमच्यावर प्रेम आहे. . I am always thankful to you. For my whole life. 🙂🙂🙂🙂🙂

तुमचाच
मयुर

Author: Lone Wolf

First of all thanks to whole internet and WordPress who allowed me to communicate with millions of people... I am just a normal human being trying to learn new things in life. I love photography, thinking, philosophy and sharing it in simple words as possible. I would like to share my some work over here through my words and photos. Your comments, suggestions and critiques are most welcome. Regards Mayur

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started